
Pimpri Chinchwad Girl death: साहिती ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. पोलिसांनी तिचा प्रियकर प्रणव राजेंद्र डोंगरे याला अटक केली आहे.

पिंपरी चिंचवड: पिंपरी चिंचवड परिसरातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील तरुणीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली होती. सहिती कलुगोटाला रेड्डी (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे. सहिती (Sahiti Reddy) ही आकुर्डीतील डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तिसऱ्या वर्षात शिकत होती. तिने वर्गमित्राच्या त्रासाला कंटाळून ती राहत असलेल्या इमारतीच्या 15व्या मजल्यावरुन उडी टाकून आत्महत्या केली. या घटनेमुळे पिंपरी चिंचवडमधील ताथवडे परिसरात एकच खळबळ उडाली होती. (Pune Crime)
पोलिसांच्या प्राथमिक तपासात साहिती रेड्डी हिच्या आत्महत्येविषयी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितले की, आम्ही साहिती रेड्डी हिने आत्महत्या का केली याचा शोध घेत असताना तिच्या मैत्रिणीबद्दल माहिती मिळाली. साहितीने आत्महत्येपूर्वी या मैत्रिणीच्या मोबाईलवर एक व्हॉईस मेसेज केला होता. या व्हॉईस मेसेजमध्ये तिने आपल्या मोबाईलचा पासवर्ड आणि तो मोबाईल कुठे ठेवला आहे, हे सांगितले होते. त्यानुसार आम्ही साहिती रेड्डी राहत असलेल्या बिल्डिंगच्या टेरेसवर जाऊन मोबाईल ताब्यात घेतला. मोबाईल मिळाल्यानंतर साहितीने मैत्रिणीला पाठवलेला पासवर्ड टाकून मोबाईल ओपन केला. (Pimpri Chinchwad Crime)
त्यामध्ये साहिती रेड्डी हिने आत्महत्येचे कारण सांगितले होते. गेल्या काही दिवसांपासून तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या प्रवण डोंगरे (वय 20) याच्याशी तिचे प्रेमसंबंध होते. प्रणव डोंगरे हा तिला प्रेमसंबंध तोडण्याची धमकी देत होता. तसेच तो आपल्याला शारीरिक आणि मानसिक त्रास द्यायचा. या त्रासामुळेच आपण आत्महत्येचा निर्णय घेतल्याचे साहिती रेड्डी हिने सांगितले आहे. इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या 20 वर्षीय तरुणींने ताथवडे परिसरातील राहत असलेल्या इमारतीच्या 15 व्या मजल्यावरून उडी मारुन 5 जानेवारी रोजी आत्महत्या केली होती. सुरुवातीला साहितीच्या आत्महत्येचे नेमके कारण पोलिसांना समजू शकले नव्हते. त्यामुळे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र,तब्बल महिनाभरानंतर या प्रकरणाचा तपास सुरु असताना ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. याप्रकरणात आता पुढे काय कारवाई होणार, हे बघावे लागेल