
Shambhuraj Desai : संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलायला राऊतांना पाच वर्षानंतर आता का सुचलं? असा सवाल करत शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

सातारा: एकनाथ शिंदे (Eknath Shinde) साहेब मुख्यमंत्री होत असताना शरद पवारांनी विरोध केला होता, या संजय राऊत यांनी केलेल्या आरोपावर बोलायला राऊतांना पाच वर्षानंतर आता का सुचलं? असा सवाल करत शिवसेनेचे नेते आणि मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 2019 मध्ये झालेल्या निवडणुकीत आम्ही निवडून आल्यानंतर 21 दिवस आम्हाला मुंबईमध्ये फिरवलं होतं. शिंदे साहेबांकडे बोट दाखवून उद्धव साहेबांनी (Uddhav Thackeray) सांगितलं होतं की आम्हाला सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवायचा आहे. एका रात्री मध्ये असं काय घडलं? संजय राऊत आता बोलत आहेत पवार साहेबांचा विरोध होता म्हणून. मात्र हे पाच वर्षांपूर्वी ते का बोलले नाहीत? अजूनसुद्धा पवार साहेबांच्या मांडीला मांडी लावून बसतात. मात्र माझं त्यांना आव्हान आहे, शरद पवारांच्या प्रवक्त्यांनी सांगावं आमचा एकनाथ शिंदे यांच्या नावाला विरोध होता.
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी आम्हाला खाजगीत सांगितले होते की..
राष्ट्रवादीच्या वरिष्ठ सर्व नेत्यांनी आम्हाला खाजगीत सांगितले होते की, हा अधिकार फक्त उद्धव ठाकरे यांना आहे. यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही. संजय राऊत जर असं विधान करत असतील तर आम्हाला त्यावेळी ज्या राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर बोललो होतो ती विधान खुली करावी लागतील. असा इशारा ही मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला. भाजपने शब्द पाळला नाही म्हणून पुन्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत, या संजय राऊत यांच्या विधानावर ते बोलत होते. एकदा संजय राऊत म्हणतात पवारांनी सांगितलं म्हणून एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केलं नाही, हे महाविकास आघाडीचे धोरण. आता म्हणतात भाजपने शब्द पाळलं नाही म्हणून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले नाहीत.. संजय राऊत हे विसंगत बोलत आहेत, असेही ते म्हणाले.
हात जोडून विनंती करतो की..
मीडियाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही संजय राऊत यांच्याकडे तुमचे माईक आठ दिवस घेऊन जाऊ नका. संजय राऊत बोलायचे बंद होतील. आमचे मित्र संजय शिरसाट यांनी सांगितल आहे की कोणत्या मनस्थितीत संजय राऊत बोलतात, असा मिश्किल टोला ही त्यांनी लगावला आहे.
आमदार, खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून?
दरम्यान, उद्धव ठाकरेंची शिवसेना ॲक्शन मोडमध्ये असल्यामुळे नाराज पदाधिकाऱ्यांच्या गाठीभेटी घेण्याबाबत मंत्री शंभूराज देसाई यांनी टीका केली आहे. ते कधीही भेटीगाठी घेत नाहीत, ते थेट मुंबईला बोलवतात. आमचा जर एकदा सदस्य रुसला तर आम्ही घरी जाऊन बसतो. यांचे आमदार, खासदार निघाले तर यांचे पॅचअप कुठे तर मुंबईला बोलावून. नाराज पदाधिकाऱ्यांची समजूत त्याच्या दारात जाऊन करायची असते. त्याला आपल्या दरबारात बोलावून समजूत निघत नसते. त्यांनी जागेवर बसून कितीही हातपाय झटकले त्याचा काही उपयोग होणार नाही. असेही शंभूराज देसाई म्हणाले.